शरद पवार यांचा महाराष्ट्रात मोठा डाव? अजित दादा गटाला खिंडार पाडणार, तीन नेत्यांची घेतली भेट
Sharad Pawar Kolhapur Visit

Sharad Pawar Kolhapur Visit
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. शरद पवार कालपासून कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. या चार दिवसांच्या दौऱ्यात ते विविध नेत्यांच्या भेटी घेत आहेत आणि जिल्ह्यातील सर्व दहा मतदारसंघांचा आढावा घेत आहेत, असे सूत्रांकडून कळते.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आता मोठी रणनीती आखत आहेत. सध्या ते कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत, ज्याद्वारे ते पश्चिम महाराष्ट्रात एक मोठा राजकीय डाव साधण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आज अजित पवार गटातील तीन नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली, त्यामुळे शरद पवार अजित पवार गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार या डावाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रावर आपला प्रभाव अधिक मजबूत करणार असल्याचेही अनुमान व्यक्त केले जात आहे.
शरद पवार सध्या चार दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, आणि आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज ए. वाय. पाटील, के. पी. पाटील आणि अशोकराव जांभळे या तिघांनी शरद पवार यांची भेट घेतली. के. पी. पाटील हे माजी आमदार असून अजित पवार गटाशी संबंधित आहेत. ए. वाय. पाटील आणि के. पी. पाटील हे नातेवाईक असून, या दोघांनी एकत्रितपणे शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी दोन्ही नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली.
के. वाय. पाटील हे राधानगरी भुदरगड मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, तसेच के. पी. पाटील हे देखील याच मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये राधानगरीसाठी रस्सीखेच सुरू आहे, आणि शरद पवार या परिस्थितीत कसे समजूत काढतात आणि कोणाला तिकीट देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहे? जांभलेंचा आग्रह,
दरम्यान, अशोकराव जांभळे यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे. जांभळे यांचा आग्रह आहे की हातकणंगले मतदारसंघ शरद पवार गटाने लढावा. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा शरद पवार काय निर्णय घेतात यावर आहेत, तसेच महाविकास आघाडी शरद पवार गटाला ही जागा सोडणार का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील १० जागांवर नजर
कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण १० जागा आहेत. या चार दिवसांच्या दौऱ्यात शरद पवार हे सर्व दहा मतदारसंघांचा सखोल आढावा घेणार आहेत आणि लोकांच्या मतांची दिशा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. या अनुषंगाने, आजचा दिवस शरद पवार यांच्यासाठी जिल्ह्यातील विविध नेत्यांशी भेटीगाठी आणि चर्चा करण्यात व्यतीत होणार आहे.
समरजित घाटगे यांचा प्रवेश
दरम्यान, समरजित घाटगे आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. कालच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, आणि आता ते अधिकृतपणे पवार गटात सामील होत आहेत. अशी चर्चा आहे की, शरद पवार समरजित घाटगे यांना अजितदादा गटाचे प्रमुख नेते हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणुकीत उतरवणार आहेत. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची होईल असे मानले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत