राज्यात मोबाईल ॲपद्वारे होणार पशु गणना, १ सप्टेंबर पासून होणार सुरुवात| Livestock Census On Mobile Application|
Maharashtra Animal Husbandary Dipartment

LiveStock Census 2024
महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाने १ सप्टेंबरपासून राज्यभर पशुगणना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गणना २१ वी असून, एकाच वेळी संपूर्ण राज्यात राबवली जाईल. यंदा प्रथमच, ही गणना मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येईल आणि चार महिन्यांचा कालावधी असेल. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. महेश शेजाळ यांनी या तयारीची माहिती दिली आहे.
पशुगणना पाच वर्षांच्या अंतराने केली जाते आणि ती देशातील जनगणनेसारखीच प्रक्रिया असते. या वर्षी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ही गणना होईल आणि ती पूर्णपणे पेपरलेस पद्धतीने राबवली जाईल. यासाठी यावेळी स्मार्टफोनचा वापर करण्यात येईल.
२०१९ मध्ये झालेल्या २० व्या पशुगणनेसाठी प्रगणकांना टॅबलेट देण्यात आले होते, तर यापूर्वीची गणना नोंदवहीत केली जात होती, ज्यामध्ये अनेक रकाने भरली जात होती. यामुळे भरताना बराच वेळ लागायचा. यावर्षी, गणनेला सुसूत्रता आणण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी विशेष ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून पशुधनाची माहिती सॉफ्टवेअरवर भरली जाईल.
पशुसंवर्धन विभागाने पशुधन पर्यवेक्षक पदविका पूर्ण केलेल्या व्यक्तींना प्रगणक म्हणून नियुक्त केले आहे. डॉ. शशांक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शेजाळ आणि डॉ. बाबर यांच्या देखरेखीखाली या प्रगणकांना तालुकानिहाय मार्गदर्शन देण्यात आले आहे.
पशुगणना मोहिमेत गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कुक्कुट, अश्व, वराह, पाळीव कुत्री, भटकी जनावरे आणि पशुपालनासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री यांची गणना केली जाईल. या गणनेच्या आधारावर शासन विविध धोरणात्मक योजना आखते आणि निधीची उपलब्धता निश्चित करते.
प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. महेश शेजाळ यांनी सांगितले की, प्रगणकांनी माहिती गोळा करताना नागरिकांनी वस्तुनिष्ठ आणि खरी माहिती द्यावी. दिलेल्या माहितीच्या आधारे पशुवैद्यकीय दवाखान्यांना लसीकरण आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी आवश्यक आढावा घेतला जातो. त्यामुळे चुकीची माहिती देऊ नये, असे त्यांनी आवाहन केले आहे आणि सर्वांनी पशुगणनेसाठी सहकार्य करावे, असे सांगितले.
ग्रामीण भागासाठी २०५ प्रगणक नियुक्त
ग्रामीण भागात दर तीन हजार कुटुंबांमागे एक प्रगणक, तर शहरी भागात चार हजार कुटुंबांमागे एक प्रगणक असे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तीन प्रगणकांसाठी एक पर्यवेक्षक नेमला आहे. यानुसार, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १२५५ गावांसाठी २०५ प्रगणक व ६१ पर्यवेक्षक असून, शहरी भागात ७६ प्रगणक व २१ पर्यवेक्षक असे एकूण २८१ प्रगणक व ८२ पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. प्रगणकांना माहिती भरताना स्वतःचा मोबाईल वापरावा लागेल, आणि त्यासाठी त्यांना मानधन दिले जाईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत